लोकप्रतिनिधींची भूमिका : १२ मिटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंची दुकाने सुरू ठेवण्याचे महापौरांचे निर्देश
नागपूर: लॉकडाऊनमुळे जनता आधीच हवालदिल झाली आहे. लॉकडाऊन लागावा अशी मानसिकता या शहरातील नागरिकांची नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचीसुद्धा ही मानसिकता असून जर प्रशासनाने जबरीने लॉकडाऊन लादला तर लोकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.
नागपुरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन लावावा की नाही यावर चर्चा करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर उपस्थित होते.
नागपूर शहरात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत बाजारातील दुकाने सम आणि विषम तारखांच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यापुढे १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावरील दुकाने दररोज सुरू ठेवण्यात यावेत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. ९ मीटर अथवा त्याखालील कमी रुंदीच्या मार्गावरील दुकानांसाठी सम-विषम तारखांचा नियम कायम ठेवण्यास त्यांनी सांगितले. अनेक दुकानदारांवर नियमाच्या नावाखाली दंड ठोठावण्यात येत आहे. हा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत झाला नाही. त्यामुळे असा बेकायदेशीररीत्या दंड आकारणे तात्काळ बंद करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
तत्पूर्वी सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले. शिवाय जी आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करीत आहे, त्यांना योग्य साहित्य पुरविणे आवश्यक आहे. त्यांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार कृपाल तुमाने यांनी जनजागृतीवर भर दिला. कोरोनाला न घाबरता कोरोना नाहीच अशी मानसिकता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आ. नागो गाणार म्हणाले, रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. जनतेची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यंत्रणेने ऍक्टिव्ह होऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ. मोहन मते म्हणाले, लॉकडऊनमुळे गरिबांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी गरिबांच्या पोटाची व्यवस्था करावी, अशी सूचना मांडली. आ. कृष्णा खोपडे म्हणाले, या विषयावर राजकारण करू नये असे सांगितले. शहराच्या आउटर भागात दारूचे अड्डे सुरू झाले आहेत. तेथे होणाऱ्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना केली.
आ. विकास कुंभारे यांनी विलगीकरणाचा मुद्दा मांडला. आ. प्रा. अनिल सोले यांनी शहरात जे निर्णय एकतर्फी घेणे सुरू आहे, त्यावर आक्षेप नोंदविला. लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे मत व्यक्त केले. स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही या शहरात लॉकडाऊन होऊ नये, अशी भूमिका मांडली. पोलिस उपायुक्त श्वेता खेडेकर यांनी पोलिसांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बाजू मांडली.
बैठक नियमित होणार
लॉकडाऊन असो, जनजागृती असो की कोरोनाची परिस्थिती असो, या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे लोकप्रतिनिधींची नियमित बैठक होईल. पुढील बैठक शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी जाहीर केले.