नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विद्युत एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन झाले. द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्याला नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अनिल मानापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन झाले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपुरात विद्युत कंत्राटदारांची संख्या वाढली आहे आणि त्यांनी नागपूरच्या औद्योगिक विकासातही योगदान दिले आहे. आता नागपुरात विद्युत उपकरणांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.’ सोलर दिव्यांचा वापर गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे.
शहरातील रस्त्यांपासून राष्ट्रीय महामार्गांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होत आहे. त्यानुसार विद्युत कंत्राटदारही नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.