नागपूर – ‘ऑल इंडिया जमियतूल कुरैश’ या कुरैश समाजातील सामाजिक संघटनेने नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. श्री. नितीन गडकरी यांना समर्थन जाहीर केले आहे. दि. १२ एप्रिलला गरीब नवाज नगर मैदानावर संघटनेचे अध्यक्ष अब्दूल गनी कुरेशी यांच्या नेतृत्वात ना. श्री. गडकरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत जाहीर केला.
माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी अब्दूल गनी यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती.
नागपुरात बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी व नागपूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना. श्री. गडकरी यांच्या नेतृत्वाची नागपूरला गरज आहे. याशिवाय कुरैशी समाजाला व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागपूरला ना. श्री. गडकरी यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे तळवेकर यांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर रामटेकचे आमदार एड. आशीष जयस्वाल आणि श्री. बंडू तळवेकर यांच्या मार्गदर्शनात ना. श्री. नितीन गडकरी यांना समर्थन देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. १२ एप्रिलला होणाऱ्या सभेत संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हाजी बशीर कुरेशी (मुंबई), एड. मजीद कुरेशी (मलकापूर) आणि मोहम्मद साबीर कुरेश (पुलगाव) सभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीला हाजी इकबाल कुरेशी, हाजी वकील कुरेशी, मीर साहब कुरेशी, दानीश कुरेशी, आसीफ कुरेशी यांचीही उपस्थिती होती.
तेलगू भाषिक महासंघाचा पाठिंबा
नागपुरातील तेलगू भाषिक महासंघाने एका पत्राच्या माध्यमातून ना. श्री. नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा व्यक्त केला आहे. नागपूर शहरातील विकासकामांची मालिका लक्षात घेऊन संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. ना. श्री. गडकरी यांनी गरजूंना वैद्यकीय मदत करणे, दिव्यांगाना कृत्रिम अवयव लावून देणे, ट्रायसिकल देणे यासारखे कार्य सातत्याने केले आहे. त्यामुळे त्यांना विनाशर्त पाठिंबा देण्यात येत असल्याचे तेलगू भाषिक महासंघांतर्गत येणाऱ्या १२ संघटनांनी म्हटले आहे.