Published On : Mon, Aug 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये क्रीडांगणांचा विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनपाच्या विविध विकास कामांचे ना. नितीन गडकरी व ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.५) भूमिपूजन व लोकार्पण झाले. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये क्रीडांगणांचा विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला.

पाचपावली अग्निशमन केंद्र व कर्मचारी संकुल बांधकामाचे भूमिपूजन, केंद्र शासन पुरस्कृत १५व्या वित्त आयोगाअंतर्गत पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच फ्रेन्ड्स कॉलनी घाट चौक ते हजारीपहाड बस स्टॉपपर्यंत १८.०० मीटर रूंद डी.पी. रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, माजी महापौर श्री. संदीप जोशी, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, माजी महापौर श्रीमती मायाताई इवनाते, माजी नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी नगरसेवक श्री संदीप जाधव, सुनील अग्रवाल, संजय बंगाले, प्रमोद कौरती, विक्रम ग्वालबंशी, भूषण शिंगणे, माजी नगरसेविका श्रीमती परिणिता फुके, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध मोहल्यांमध्ये 60 स्टेडियम आपण तयार करण्यासाठी दीडशे कोटीचा आराखडा तयार केला असल्याचे सांगितले. नागपूर शहरांमध्ये केंद्र व राज्य शासनाने गेल्या दहा वर्षांमध्ये सातत्याने शहराचा चेहरा बदलण्याचं काम केले आहे. नागपूर शहरामध्ये इलेक्ट्रिक बसेस दिल्या आहेत. नागपूरमध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यात येऊन पूर्णपणे प्रेडिक्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट रहाणार आहे. आता संपूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आणि ज्याला आपण सॅटेलाईट कंट्रोल अशा प्रकारची ही ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार होणार आहे. नागपूर शहरात परिवर्तन होत आहे. नागपूरची नवीन ओळख ग्लोबल सिटी म्हणजे ही वैश्विक शहर तर आहेत पण परवडणारा वैश्विक शहर ही नवी ओळख शहराला मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले की, पोलीस लाईन टाकळी ते काटोल नाका पर्यंत उड्डाण पुलाचे डीपीआर तयार झाले आहे. तसेच पश्चिम नागपूरकरांना नवीन गोधनी रेल्वे स्टेशनच्या रूपात मोठी भेट मिळणार आहे. शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात क्रीडांगणांचा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. शहरातील रिंग रोड भागातून नागरिकांच्या सोयीसाठी ट्रॉम सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, सांस्कृतिक, क्रीडा या सर्व क्षेत्रात शहराचा विकास करून नागपूर शहर सुंदर, प्रदूषणमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रास्ताविकात तीनही प्रकल्पांची सविस्तर माहिती विषद केली. तसेच त्यांनी या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले

आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. प्रवीण दटके, माजी महापौर मायाताई इवनाते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले. आभार अंकिता मोरे यांनी मानले.

पाचपावली अग्निशमन केंद्र व कर्मचारी संकुल भूमिपूजन
कमाल चौक येथे पाचपावली अग्निशमन केंद्र व कर्मचारी संकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मौजा हंसापुरी नगर भूमापन क्र.- १२५८ येथे मनपाचे जूने अग्निशमन केंद्र होते. सदर अग्निशमन केंद्राची इमारत जीर्ण झाल्याने त्याच जागेवर अग्निशमन केंद्र व कर्मचारी संकुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. प्रस्तावित अग्निशमन केंद्राच्या जागेचे क्षेत्रफळ १७०८.९४ चौ.मी. एवढे आहे. बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता राशी रु. २२.८५ कोटी असून प्रस्तावित बांधकामाचे क्षेत्रफळ ३०८६.८२ चौ.मी. आहे. प्रस्तावित इमारतीचे वाहनतळासह ५ मजले बांधकाम प्रस्तावित आहे. तळ मजल्यावर अग्निशमन कार्यालयासह ४ अग्निशमन (Fire Tender) वाहने उभी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. पहिला माळा ते पाचवा माळयात एकूण ३४ कर्मचारी निवासस्थान प्रस्तावित आहे. सदर कामाचा रु. १८.३८ कोटी रकमेचा कार्यारंभ आदेश मे.आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलेले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. पाचपावली अग्निशमन केंद्राचे बांधकाम पपूर्ण होउन कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील लष्करीबाग, पाचपावली, ठक्करग्राम, बाळाभाऊपेठ, वैशाली नगर कांजी हाउस, राणी दुर्गावती नगर, यादव नगर, महेंन्द्र नगर, बाबा बुध्दाजी नगर, बुध्द नगर टेका, भोसलेवाडी, पंचशील नगर या भागातील अंदाजे २.५ ते ३.०० लक्ष नागरिकांना आपात्कालीन स्थितीत अग्निशमन सेवा उपलब्ध होईल.

पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरूज्जीवन
नागपूर शहरातील पश्चिम भागामध्ये असलेल्या पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरूज्जीवनाचे कार्य केंद्र शासनाच्या वित्त विभागाच्या पत्रान्वये १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत करण्यात येणार आहे. तलावाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे २.०२ हेक्टर असून तलाव पोलिस विभागाच्या अखत्यारित आहे. केंद्र शासनाच्या शहरी आवास व कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासन व नागपूर महानगरपालिका यांच्यामध्ये २८ मार्च २०२२ रोजी झालेल्या करारनाम्यानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रात पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी आहे. नागपूर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या निर्देशान्वये पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला होता. प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढणे, पादचारी मार्ग, पावसाळी नाली टाकणे, तलाव किनार भिंत (Edge Wall) बांधणे आदी कामे केली जाणार आहेत. तलावाच्या परिसरामध्ये विसर्जन टँक करण्यात येणार असून कामाची मुदत १२ महिने आहे. पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे तलावातील ३६१०८३ मी. गाळ काढण्यात येणार असून यामुळे तलावाची संचय क्षमता ३६१०८३ मी. ने वाढणार आहे. सदर प्रकल्पामुळे नागपूर शहरातील पर्यटनाकरीता नागरिकांना पोलिस लाईन टाकळी तलाव उपलब्ध होवून पर्यावरणीय संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होईल.

फ्रेन्ड्स कॉलनी शिवाजी चौक ते हजारीपहाड बस स्टॉप रस्त्याचे लोकार्पण
नागपूर महानगरपालिकेद्वारे बांधकाम करण्यात आलेल्या फ्रेन्ड्स कॉलनी येथील शिवाजी चौक ते हजारीपहाड बस स्टॉप पर्यंत १८ मीटर रुंद डी.पी. रस्त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. महानगरपालिका तरतुदी अंतर्गत मौजा हजारीपहाड येथे फ्रेन्ड्स कॉलनी येथील शिवाजी चौक ते हजारीपहाड बस स्टॉप पर्यंत ३५० मीटर लांबीच्या आणि १८ मी. रुंद डी.पी. रस्त्याचे बांधकामाचा प्रकल्प करण्यात आला. संपूर्ण प्रकल्पाची किंमत रु. ३.८८ कोटी आहे. या डी.पी रस्त्याचा विकास करताना संपूर्ण लांबीमध्ये १५ मीटर रुंदीत खडीकरण व डांबरीकरणासह दोन्ही बाजूस १.५ मी रुंद पादचारी मार्ग, पावसाळी नाली, बॉक्स कलर्वट आदी सुध्दा निर्माण करण्यात आले आहेत. या नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यामुळे मनोहर विहार कॉलनी, भिवसेनखोरी, हजारीपहाड, इत्यादी वस्तींच्या नागरिकांना आवागमना करिता सोयीचे झाले आहे.

Advertisement