नागपूर : समाजाच्या हितासाठी एकादी संस्था प्रामाणिकपणे उभारण्यात आली असेल तर गरजच पडल्यास कुणालाही देणगी मागायला लाज वाटायला नको, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ व हृदयरोग विभाग केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, उपाध्यक्ष पराग सराफ उपस्थित होते.
समाजसेवा सुरु केल्यास ती निरंतर सुरु राहणे गरजेचे आहे. समाजसेवेचे कार्य पाहता अनेक सक्षम लोकांकडून देणगी मिळत असते. मात्र त्या देणगीचा उपयोग सर्वसामान्यांच्या गरजा भागवण्यासाठी करणे गरजेचे आहे.
खापरीतील स्वामी विवेकानंद मिशन रुग्णालयाला स्वयंसेवकांनी पूर्ण क्षमतेने मदत केली. या रुग्णालयाच्या माध्यमातून माफक दरात गरिबांवर दर्जेदार उपचार होणार आहे. तसेच समाजात चांगल्या गोष्टी समोर येणे गरजेचे आहे. चांगल्या गोष्टींचे प्रमाण वाढल्यास वाईट गोष्टी समाजातून कमी होत जातील, असेही डॉ. भागवत म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समाजात स्वामी विवेकानंद मिशन रुग्णालयासारख्या नि:स्वार्थ संस्थांची गरज आहे. पन्नास वर्षांपूर्वी देशात अन्न- वस्त्र- निवारा ही मूलभूत गरज मानली जात होती. परंतु आता शिक्षण- उत्पन्न- औषधोपचार ही मूलभूत गरज झाली असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.