शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले.. असे अनेक प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचा विजयरथ कुणीही थांबवू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
‘महाविजय-2024’ अंतर्गत शिरूर लोकसभा प्रवासात ते माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे यांनी शरद पवारांवर थेट हल्ला चढविला. ते म्हणाले, अजित पवार, छगन भुजबळ यांनी शरद पवारांविषयी सांगितले आहे, त्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ते म्हणाले, मुख्यमंत्री पदावर अजित पवार की देवेंद्र फडणवीस असा वाद होण्याची शक्यताच नाही. भाजपा कार्यकर्त्यांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना ते मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. 2024 च्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर केंद्रीय पार्लिमेंट्री बोर्ड जो निर्णय घेईल, तोच मुख्यमंत्री होईल.
या प्रवासात प्रदेशाध्यक्षांसोबत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, आ. महेश लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. राहुल कुल, आ. अश्विनीताई जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष शंकर बुट्टे पाटील, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, योगेश टिळेकर, आशाताई बुचके, प्रदीप कंद, विकास डोळस, धर्मेंद्र खंडारे, जयश्री पलांडे, अतुल देशमुख, अमोल भुजबळ, सचिन पांडे, संतोष नाना खैरे, आशीष माळवद, शरद दरेकर, संजय पाटनी, कुलदीप परांडे, रामदास कुंभार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरियर्स व कार्यकर्ते उपस्थित होते.
• बारामतीची जागा 51 टक्के मतांनी जिंकू
बारामतीत महायुतीचा उमेदवार 51 टक्के मते घेऊन निवडून येईल. उमेदवारी कुणाला दिली जाईल हा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेईल. त्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवार कुटुंबातीलच उमेदवार असेल किंवा कुणी अन्य असेल यासंदर्भात आता काहीही सांगता येणार नाही, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
• ‘त्यांना’ एक सेकंदासाठीही अजितदादा नकोत !
अजित पवारांना अंडर इस्टिमेट करण्याचे काम सुप्रिया सुळे करीत आहेत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सर्वांत पहिला हार मी घालेन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्या तरी त्या अंर्तमनातून बोलल्या की भाऊ-बहिणीचे प्रेम म्हणून बोलल्या हे सांगता येत नाही, त्यांना एक सेकंदासाठीही अजितदादा चालत नाही.
• सतत संवाद, हितजुग व पदाधिकाऱ्यांना आवाहन
प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रवास नारायणगाव येथून सुरू केला. महाविजय 2024 अंतर्गत नारायणगाव येथे जुन्नर, आंबेगाव व खेड आणि भोसरी येथे शिरूर, हडपसर व भोसरी विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व शिरूरचा खासदार महायुतीचाच निवडून यावा असे आवाहन केले. नारायणगाव व भोसरी येथे घरचलो अभियानात सहभागी होत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी हितगुज केले. हजारो नागरिकांशी संपर्क साधत पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न केला, त्यावर सर्वांनी एकसुरात नरेंद्र मोदी यांचे नाव घेत, भाजपाला समर्थन दिले. या प्रवासात त्यांनी काही प्रतिष्ठित मान्यवरांशी स्नेह भेट घेतली व समसामायिक विषयांवर चर्चा करीत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मागितले.
• आज बारामती लोकसभेत प्रवास
प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहेत. सकाळी 10.00 वा. घायरी येथील मुक्ताई गार्डन येथे पुरंदर, भोर-वेल्ला-मुळशी व खडकवासला आणि दुपारी 04.00 वा दौंड येथील प्राईम स्केअर हॉटेल येथे बारामती, इंदापूर व दौंड विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व पदाधिकाऱ्यांशी ते सवांद साधणार आहेत. सकाळी 11.30 वा. घायरी येथे मुक्ताई गार्डन ते बिकानेर स्वीट मार्ट चौकपर्यंत आणि सायं. 06.00 वा. दौंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकपर्यंत घर चलो अभियनात सहभागी होत नागरिकांशी हितगुज करणार आहेत. या दौऱ्यात ते काही प्रतिष्ठित नागरिकांशी स्नेह भेट घेतील.