नवी दिल्ली : ठाकरे गटाकडे शिवसेनेची असलेली संपत्ती शिंदे गटाला देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकर्त्याला खडेबोल सुनावले. शिवसेनेची संपत्ती शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण ? तुमचे स्थान काय ? असा प्रश्न विचारत ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
शिवसेना भवनासह पक्षाचा निधी, शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. याचिका दाखल करणाऱ्या वकील आशिष गिरी यांना सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० आमदारांना घेऊन शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता गमवावी लागली. शिंदे यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही शिंदे गटाला मिळाले. पक्ष आणि पक्षचिन्ह गमावल्यानतंर आता संपत्तीबाबत दाखल केलेल्या याचिकेमुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या याचिका फेटाळल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.