नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नवीन विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता डॉक्टरांना वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या आदेशामुळे प्रशासन-डॉक्टरांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
आगोदर मेयो रुग्णालयातील विद्यार्थी संख्या पूर्वी १०० होती.मात्र आता शासनाने येथील एमबीबीएसच्या जागा २०० वर नेल्या. परंतु, वाढीव विद्यार्थी संख्येनुसार येथे वसतिगृहाची सोय केली नाही. त्यातच मेयोतील एका वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन वसतिगृहात राहणाऱ्या १०० आंतरवासिता विद्यार्थ्यांना प्रशासनाने शुक्रवारी अचानक सात दिवसांत वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस बजावल्याने एकच खळबळ निर्माण झाली.
आंतरवासिता डॉक्टरांचे ५ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आणखी सात महिन्यांचे शिल्लक आहे. या डॉक्टरांनी अधिष्ठात्यांशी चर्चा करून प्रसंगी एका खोलीत दोन ऐवजी ४ ते ५ विद्यार्थी राहण्याची तयारी दर्शवली तरीही प्रशासनाला ते मान्य नाही. त्यामुळे विद्यार्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.