Published On : Tue, Oct 15th, 2019

मनपातील १२ कर्मचा-यांना निलंबनाचे नोटीस

Advertisement

स्वच्छतेबाबत आयुक्तांनी घेतली गांभीर्याने दखल : मुख्यालय परिसरात थुंकणा-या कर्मचा-यांवर कारवाई

नागपूर : शहरात सर्वत्र स्वच्छता राहावी, सार्वजनिक ठिकाणी घाण होउ नये यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील विविध भागांमध्ये देखरेख ठेवली जात आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करुन शहर विद्रुप करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. मात्र केवळ शहरातच नव्‍हे तर सिव्‍हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही मनपाच्या उपद्रव शोध पथकाने थुंकणा-यांवर कारवाई केली. या प्रकरणाची आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने दखल घेत १२ कर्मचा-यांना शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित का करु नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावले.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी वाहन चालक शेखर शंखदरबार, शिक्षण विभागातील सहायक अधीक्षक अनिल कराडे, स्थानिक संस्था कर विभागाचे समिती विभागात कार्यरत मोहरीर भुपेंद्र तिवारी, आरोग्य विभागाचे मागासवर्ग कक्षात कार्यरत सफाई मजदुर अविनाश बन्सोड, आरोग्य विभागातील जमादार स्वप्नील मोटघरे, एस.आर.ए. विभागातील चपराशी भगवानदिन पटेल, स्थानिक संस्था कर विभागाचे पीबीएक्स येथे कार्यरत मोहरीर विकास गावंडे, कर व कर आकारणी विभागातील कर संग्राहक सुनील मोहोड, कर व कर आकारणी विभागातील वित्त विभागात कार्यरत ज्येष्ठ श्रेणी लिपीक प्रमोद कोल्हे, अग्निशमन विभागातील हॅड्रन्ट कुली रवींद्र सतभैया, सामान्य प्रशासन विभागातील मजदुर शैलेश ढगे, कर व कर आकारणी विभागातील विभागातील कनिष्ठ निरीक्षक प्रमोद मोगरे या १२ कर्मचा-यांवर आयुक्त अभिजीत बांगर यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाचे नोटीस दिले.

नियमांचे उल्लंघन करुन शहर विद्रुप करणा-यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे. ११ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपा. मुख्यालयात एकुण १०५ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करण्यासाठी दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये उघड्यावर लघवी करणा-या १५ प्रकरणात ३००० रुपये, ९० प्रकरणात ९००० रुपये दंड याप्रमाणे १०५ प्रकरणात एकूण १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्या १०५ जणांमध्ये मनपाच्या विविध विभागात कार्यरत १२ अधिकारी, कर्मचा-यांचा समावेश आहे.

कुठेही घाण करू नका, अन्यथा कारवाई
आपले घर, परिसर, शहर स्वच्छ ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र याशिवाय आपण जिथे काम करतो त्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहावी ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कुठेही घाण करु नये. घाण करुन आपले परिसर, शहर विद्रुप करणारे निदर्शनास आल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे .

Advertisement