नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली. आता गवळीने संचित रजेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
त्यामुळे न्यायालयाने बुधवारी कारागृह उपमहानिरीक्षकांना नोटीस बजावून यावर १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
याप्रकरणी न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
काही दिवसांपूर्वी गवळीने संचित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. परंतु, गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या असल्याने व त्याला रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तो अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यावर गवळीचा आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे.