नागपूर: शहरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
नुकतेच गुन्हे शाखा यूनिट क्रमांक २ ने जिल्ह्यातील एका दर्ग्यात लपून बसलेला कुख्यात गुन्हेगार शेख अफसर उर्फ अंडा शेख युसुफ याला शिताफिने ताब्यात घेवून वाठोडा पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्या विरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात आरिफ इरफान पठाण (वय २८) याने तक्रार दिली होती.
पोलिस ठाणे वाठोडा नागपूर शहर येथे दाखल उपरोक्त गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील आरोपी शेख अफसर उर्फ अंडा शेख युसुफ याचा शोध पोलिस घेत होते. त्याचा शोध गुन्हे शाखा यूनिट २ घेत असताना आरोपी कन्हान नदीच्या पुलाजवळ, कामठी रोड येथील जंगलात असलेल्या दर्गामध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहिती नुसार गुन्हे शाखा यूनिटच्या अधिकारी व अंमलदार यांनी तिथे जावून त्याला ताब्यात घेतले. वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले. यापूर्वी गिट्टीखदान पोलिसांनी अफसर अंडा उर्फ शेख अफसर शेख युसूफ याच्या घरावर छापा टाकून सहा काडतुसे जप्त केली होती. तो गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी प्रसिद्ध गुन्हेगार आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विक्रीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो गांजा विकायचा. पण गेल्या काही वर्षांपासून तो मेफेड्रान विकण्यात सक्रिय आहे.
अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी अफसर अंडा याला अनेकदा अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. अखेर आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे.