नागपूर : शहरात एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन कुख्यात आरोपीला अटक केली आहे.सुनिल रामकिशोर श्रीवास (वय 38, लोकमान्य नगर) आणि नविन देविदास रासा (वय 37, प्रकाश नगर, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून 20 मोटारसायकल आणि एकूण 13 लाख 5 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
माहितीनुसार,पोलीस पथकांनी गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध लावला. त्यानंतर मेट्रो स्टेशन, हिंगणा रोड येथे ट्रॅप लावून पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्या कबुली जबाबानुसार विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन ते सर्व जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून एमआयडीसी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकारी रविंद्र सिंगल (पोलीस आयुक्त, नागपूर) आणि लोहित मतानी (पोलीस उप आयुक्त , परी मंडळ क्र १) यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास पथकातील कर्मचारी महेश चव्हाण (वपोनि), संजय बनसोड (सपोनि), व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.