नागपूर : नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महापालिकेने माय नागपूर एनएमसी व्हाट्सॲप चॅटबोटची स्मार्ट सेवा सुरू केली आहे. या सुविधेचा शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते आज महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात झाला. नागपूर महापालिकेच्या डीजीटल इंडीयाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम व माहिती व तंत्रज्ञान प्रमुख श्री. स्वप्निल लोखंडे उपस्थित होते.
नागरिकांना मालमत्ता कर भरणा करण्यासोबतच इतर सुविधा व्हाट्सअपच्या सहाय्याने करण्यासाठी मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून चॅटबोटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. चॅटबोटच्या माध्यमातून नागरिक आवश्यक असलेली माहिती सुद्धा मोबाईलवर मिळवू शकतात. नागरिकांना विविध करांचा भरणा या द्वारे करता येणार आहे. या माध्यमातून महापालिकेतर्फे चार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
चॅटबोटच्या माध्यमातून नागरिक मालमत्ता कर यूपीन नंबर टाकून जमा करू शकतात. यावरून मालमत्ता कराचे मागणी देयक सुद्धा मिळू शकते. यासोबतच चालू वर्षाचे मागणी देयक, कर भरण्यासाठी असलेल्या सवलती, दंडाची रक्कम, ऑनलाईन पैसे भरण्याची लिंक सुद्धा यावेळी नागरिकांना उपलब्ध राहील.
त्याचप्रमाणे मालमत्ता कराचे कोणतेही देणी बाकी नसल्याचे नो ड्यू सर्टिफिकेट या माध्यमातून नागरिकांना मिळू शकणार आहे. यासाठी सुद्धा नागरिकांना यूपीन टाकल्यास या प्रणालीच्या माध्यमातून माहिती प्रमाणित झाल्यानंतर पीडीएफ स्वरुपात प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. या माध्यमातून मागणी, वसुली व शिल्लक थकबाकीचा तपशील मिळवून घेता येईल. यामुळे मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तेची आर्थिक स्थिती स्पष्टपणे समजून येईल.
त्याचप्रमाणे ग्राहक क्रमांक टाकून पाणी कराचा भरणा करता येणार आहे. या चाटबोरद्वारे चालू थकबाकी, मागील भरणा व ऑनलाईन पाणी देयक अदा करण्यासाठी लिंक उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे त्याचप्रमाणे सर्व सेवा घरबसल्या व्हाट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे.