मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्तपदावर रुजू झाल्यानंतर धाडसी निर्णय घेत धडाकेबाज कारवाई करणा-या तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
नवी मुंबईतील भूमाफिया, अनिधिकृत बांधकाम, ठेकेदार आणि गैरकारभाराला सहकार्य करणा-या महापालिकेतील अधिका-यांविरोधात आयुक्त तुकारम मुंढे यांनी धडाकेबाज कामगिरी केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांना अनधिकृत बांधकामाबाबत सरकारच्या धोरणाशी घेतलेला आक्रमक विरोधी पवित्रा महागात पडला असल्याचं बोललं जात आहे.
तुकाराम मुंढे यांनी ठेकेदार, राजकारणी यांना सळो की पळो करुन सोडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात २५ ऑक्टोंबरला त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला.
१११पैकी १०५ सदस्यांनी या ठरावास पाठिंबा दिला होता. भाजपाच्या ६ नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीला विरोध केला होता.
२०१५पर्यंतची घरे नियमित करण्याच्या धोरणासंदर्भात शासनाने उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले होते. या धोरणाला विरोध दर्शविणारे शपथपत्र नवी मुंबई महापालिकेच्यावतीने मुंढे यांनी सादर केले. तसेच या धोरणाला मंजुरी देण्यास न्यायालयाने नकार दिला आणि याच दिवशी त्यांची आयुक्तपदावरून बदली करण्यात आली.
तुकाराम मुंढे यांची शनिवारी पुणे परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी (पीएमपी) नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.