नागपूर: शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने वाळू खरेदीसाठीची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे. यासाठी शासनाचे महाखनिज हे संकेतस्थळ उपलब्ध असणार आहे. 600 रुपये प्रति ब्रास या दराने ही वाळू विक्रीसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज ऑनलाईन वाळू खरेदी संकेतस्थळा-विषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विजय आनंद, पोलिस उपायुक्त मुम्माका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, कार्यकारी अभियंता अनिता पराते, परिवहन अधिकारी एस.पी.फासे यावेळी उपस्थित होते.
नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असलेल्या रेतीसाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानुसार 600 रुपये प्रती ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होणार असून वाहतुकीच्या सशुल्क सुविधेमुळे ऑनलाईन वाळू घरपोच मिळणार आहे. अत्यंत माफक दरात वाळू उपलब्ध झाल्यामुळे अवैध वाळू उत्खननाला आळा बसण्यास मदत होईल. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.
प्रति ब्रास इतका असेल दर
जिल्ह्यातील वाळूचा दर हा प्रती ब्रास 600 रुपये असणार आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान 60 रुपये, एस आय चार्जेस 16.52 रुपये असे एकूण 676.52 रुपये शुल्क असणार आहे. एका कुटुंबाला 10 ब्रास वाळू खरेदी करता येणार आहे. यासाठी संबंधित कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड आवश्यक असणार आहे. जिल्ह्यातील 11 डेपो रेतीसाठी उपलब्ध असतील.
नोंदणीसाठी संकेतस्थळ
महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी https://mahakhanij.maharashtra.gov.in/home.html हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. संकेतस्थळावर वाळू वाहतूक करणाऱ्याया वाहतुकदारांची यादी व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मोबाईलवरूनही होईल शुल्क भरणा
अत्यंत सहज व सुलभरीत्या वाळु खरेदीसाठीची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे. मोबाईल, लॅपटॅाप किंवा आपले सेवा केंद्रावरून ही नोंदणी करता येईल. शुल्क भरणाही ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यासंदर्भातील प्रात्यक्षिक आज जिल्ह्याधिकाऱ्यांसमक्ष सादर करण्यात आले.
तालुकानिहाय साठा
प्रधानमंत्री आवास योजनेकरिता तालुकानिहाय वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात सावनेर उपविभागातील सावनेर (500 ब्रास), कळमेश्वर (300 ब्रास), काटोल (200 ब्रास), नरखेड (200 ब्रास) असा एकूण 1200 ब्रास साठा उपलब्ध असेल. पारशिवनी उपविभागांतर्गत पारशिवनी (1500 ब्रास), रामटेक (1500 ब्रास), असा एकूण 3 हजार ब्रास साठा उपलब्ध असेल. कामठी उपविभागांतर्गत कामठी (1000 ब्रास), हिंगणा (500 ब्रास) असा एकूण 1500 ब्रास उपलब्ध असेल. मौदा उपविभागांतर्गत मौदा (500 ब्रास), भिवापूर (500 ब्रास), कुही (500 ब्रास), उमरेड (500 ब्रास) अशी एकूण 2000 हजार ब्रास वाळू उपलब्ध असेल. जिल्ह्यात एकूण 35 हजार 5 ब्रास इतका वाळू साठा उपलब्ध असेल.