पुढच्या ६० दिवसांत जुमल्यांचा पाऊस पडणार
नागपूर: येणा-या दोन महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या स्वरुपात युद्ध सुरू होत आहे. ते युद्ध जिंकलेच पाहिजे, यासाठी तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा समारोप नागपुरातील सद्भावना मैदानावर विशाल जाहीर सभेने झाला रविवारी झाला. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय किसान व शेतमजूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा, आमदार सुनील केदार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, बबनराव तायवाडे, नाना गावंडे, अतुल कोटेचा, अभिजीत सपकाळ, अनंत घारड प्रदेश काँग्रेसचे सचिन रामकिसन ओझा, अभिजीत सपकाळ प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणालेकी, भाजपाने खोटे स्वप्न दाखवून मते घेतली. परंतु ते सत्तेत आल्यानंतर लोकांचा अपेक्षा भंग झाला. लोकांची फसवणूक झाली आहे. ते पुन्हा लोकांना फसवू शकणार नाहीत. संविधानाचे रक्षण झाले पाहिजे. संविधानानुसार सरकार चालले पाहिजे. मात्र मोदी सरकारने संविधानच बदलायचा घाट घातला आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर जनतेचा मताचा अधिकारही काढून घेतील असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुनियोजित पद्धतीने काम करते. या शक्तीला टक्कर देण्यासाठी केवळ भाषण नव्हे तर आपण एकजूट राहिलो पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपण राहुल गांधी आणि आपण अशोक चव्हाण आहोत असे समजून काम केले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, तीन राज्यातील निकालाने जनतेने भाजपला इशारा दिला आहे. विजयाची ही मालिका कायम ठेवण्यासाठी संघर्ष सुरुच ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान हे डरपोक आहेत. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना संसदेत उत्तर देण्याचे धाडस त्यांच्यात नाही. त्यामुळे ते राफेलवरील चर्चेत सहभागी झाले नाही. रामदेवबाबा यांना भाजप सरकारने मिहान आणि विदर्भात अनेक जमिनी दिल्या आहेत. रामदेबाबा हे भाजपचे एजन्ट आहेत, असा आरोप विलास मुत्तेमवार यांनी केला.
राज्याची तिजोरी खाली करण्याचे काम भाजपाने केले आहे. राज्याला बरबाद केले आहे. शेतक-यांना कर्ज माफी मिळाली नाही. शेतमालास भाव दिला गेला नाही. फडणवीस अजून अभ्यास करीत आहेत. काँग्रेसच्या तीन राज्यात झालेल्या कर्जमाफीतून त्यांनी शिकले पाहिजे, अशी टीका उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
गेल्या पाच वर्षांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या चुकीच्या आणि अन्यायकारक धोरणाविरोधात आंदोलने केली. सरकारने गुन्हे दाखल करून दडपशाही केली तरी कार्यकर्ता डगमगले नाहीत, भाजपला सत्तेवरून दूर केल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असे विकास ठाकरे म्हणाले.
या सभेत विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विशाल मुत्तेमवार यांनी सुत्रसंचालन केले.