नागपूर : शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांनी थैमान घातला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून एकाच दिवसात २४ जणांना चावा घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे,असे एका अहवालातून समोर आले आहे.
वाठोडा परिसरातील अनमोलनगर येथील शिवाजी पार्क परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर त्यांच्या घरासमोर हल्ला केला. जीएमसीएच कॅम्पसमध्ये दोन डॉक्टरांवरही कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. 2022-23 मध्ये नागपुरात कुत्रा चावण्याच्या 8722 घटना घडल्या. दररोज सरासरी 24 लोकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहे.
अहवालानुसार, 2021-22 मध्ये कुत्रा चावण्याच्या 6806 प्रकरणे समोर आली आहेत. परंतु 2022-23 मध्ये 22 टक्के वाढ झाल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी केवळ नागपूर महापालिकेच्या रुग्णालयांची आहे. यामध्ये मेयो, जीएमसीएच आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचा समावेश नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील काही भागात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी एनएमसी आणि इतर यंत्रणांना अनेक आदेश दिले होते. महिन्यानिहाय कुत्रा चावण्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या सहा महिन्यांत शहरात4,576 प्रकरणे नोंदवली गेली.
महाल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्वाधिक 3664 प्रकरणे आढळून आली आहे. महापालिकेच्या इंदिरा गांधी रूग्णालयात गेल्या वर्षभरात 1 हजार 987 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. महापालिकेच्या सदर रुग्णालयात 1,721 जणांवर कुत्रा चावल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती सामोर येत आहे.
दरम्यान 2022-23 या वर्षात फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच कुत्रा चावण्याचे प्रमाण कमी झाले. या दोन महिन्यांत प्रकरणांची संख्या सातशेहून अधिक होती. मात्र, जानेवारी महिन्यात कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याची एक हजार प्रकरणे समोर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.