वर्धा – आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी मेघे येथील नर्सिंग महाविद्यालये व रुग्णालयाद्वारे परिचारिका सप्ताह साजरा करीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सावंगी येथील श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालय, शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ बी. एस्सी. नर्सिंग, फ्लोरेन्स नायटिंगल ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंग आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताहात परिचर्या व शुश्रूषा विषयाशी निगडित निबंध लेखन, प्रश्न मंजूषा, एकपात्री अभिनय, उत्स्फूर्त भाषण, कचऱ्यातून कला, चित्रकला, रेखाटन, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दत्ता मेघे सभागृहात आयोजित या सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंगी रुग्णालयाच्या परिचर्या संचालक मंजू भट्टाचार्य होत्या. तर प्रमुख अतिथी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधिपरिचारिका ज्योती गजभिये, श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली ताकसांडे, शालिनीताई मेघे नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना शर्मा, श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य इंदू अलवाडकर, शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ जीएनएम नर्सिंगच्या प्राचार्य अख्तरीबानो शेख, उपप्राचार्य डॉ. अर्चना मौर्या, सविता पोहेकर, फ्लोरेन्स नायटिंगल ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंगच्या लीना पाहुणे, शालिनीताई मेघे स्कूल ऑफ नर्सिंगच्या मीनाक्षी चौधरी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. जया गवई, सल्लागार अर्चना तेलतुमडे, वैशाली बालपांडे, भाग्यश्री गणेशपुरे व सीमा येळणे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी प्रणिता पोहनेकर यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ सर्व पुरस्कृत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग होता.