Published On : Mon, Oct 2nd, 2023

ओबीसी जागर यात्रा ओबीसी समाजाला प्रगतीची दिशा दाखवणार.. – चंद्रशेखरजी बावनकुळे

बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ. | उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि इतर मोठ्या नेत्यांचा सहभाग.| डॉ. आशिषराव र. देशमुख आणि श्री. संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करणार.
Advertisement

संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ ०२ ऑक्टोबर २०२३ ला, गांधी जयंतीच्या दिवशी बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन तसेच त्यानंतर हिंगणघाटच्या पार्डी येथे ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

“पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना ३३% आरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत ९० महिला आमदार आणि १९० महिला खासदार होणार. महिला देशाची ताकद आहे. कॉंग्रेसने त्यांच्या दीर्घकालीन कार्यकाळात ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, त्यांची दिशाभूल केली. मोदी सरकारने ओबीसी समाजाला २७% आरक्षण शिक्षणासाठी दिले. विश्वकर्मा योजनेतून ओबीसी समाजाला मोठा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रात श्री. देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी मंत्रालय सुरु केले, जेणेकरून ओबीसींची प्रगती व्हावी. सध्याच्या राज्याच्या महायुती सरकारने ओबीसी आरक्षण वाचविण्याचे मोठे काम केले. युवक, शेतकरी, महिला सुखी झाले पाहिजे, हे या ओबीसी जागर यात्रेचे उद्दिष्ट आहे. डॉ. आशिष देशमुख या लढवय्या नेत्याच्या नेतृत्वात ही ओबीसी जागर यात्रा विदर्भात भ्रमण करत आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय सर्वेक्षण करावे, ही डॉ. आशिष देशमुख यांची मागणी मी मा. मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार. पुढील पंतप्रधान हे नरेंद्रजी मोदीच व्हावेत, ही जनतेची इच्छा आहे. हिंदू समाजाला संपवून टाकणाऱ्या विरोधकांना धडा शिकवा. ओबीसी समाजाला शासनाच्या योजनांचा फायदा मिळणार”, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.

Advertisement

“ओबीसी हा भाजपाचा गाभा आहे. भाजपा ओबीसींचा, ओबीसी भाजपाचा हे आमचे ब्रीद वाक्य असून ओबीसी समाजाच्या हिताकरिता आणि त्यांच्या प्रगतीकरिता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आणि भाजपा सत्तेत असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने देखील भरपूर कामे केली आहेत. ओबीसी समाजासाठी शासनाने ज्या महत्वाच्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. ही यात्रा आपल्या जिवाभावाची आहे. संघर्ष करून मिळविलेल्या हक्काची आहे. ओबीसींच्या सामाजिक प्रगतीसाठी आपला निरंतर संघर्ष राहणार आहे. जरांगेंनी संभ्रम निर्माण करू नये. उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही आपल्या सरकारची भूमिका आहे. एक मुद्दा विसरू नका, महाराष्ट्रातील महायुती सरकार ओबीसींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. महाराष्ट्रात बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय सर्वेक्षण करावे”, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले.

ओबीसी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजजी अहीर, खासदार श्री. रामदासजी तडस, आमदार समीर कुणावर, ओबीसी राष्ट्रीय सरचिटणीस खासदार श्री. संगमलाल गुप्ता, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. संजय गाते आणि इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी 800 बाईकची भव्य रॅली हिंगणघाटचे लक्ष वेधून घेत होती. यात्रा देवळी, कळंब, यवतमाळ मार्गाने पुढे निघाली.

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिषराव र. देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करणार आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.

ओबीसी जागर यात्रेची सुरुवात हिंगणघाटपासून झाली असून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले आहे.]

(सोबत ओबीसी जागर यात्रेचे वेळापत्रक जोडले आहे.)
संपूर्ण यात्रेदरम्यान आपले मीडिया आणि वर्तमानपत्र प्रतिनिधी पाठवून या यात्रेला प्रसिध्दी द्यावी, ही नम्र विनंती.