नागपूर : मराठा आरक्षणसाठी अंतरवली-सराटी गावात एका विशाल सभेला संबोधित करताना जरंगे-पाटील यांनी सरकारला ८ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पाटील यांच्या भूमिकेनंतर ओबीसी समाजाने संताप व्यक्त केला आहे. यापार्श्वभूमीवर आज नागपुरात विविध ओबीसी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण द्या, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्के मर्यादा भंग करू नये. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी कुणबी जातीचे दाखले द्या,अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी (१६ ऑक्टोबरला) सकाळी ११.३० वाजता नागपुरातील रविभवनमध्ये ओबीसी संघटनांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करतानाच सरकारकडून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
नागपुरात होणाऱ्या बैठकीत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीमसह संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ५० हून अधिक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.