नागपूर : फुटाळा तलावाच्या परिसरात असलेल्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाल्याच्या मुद्दयावरून राजकारण तापले होते.पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आणि अन्याय निवारण मंचाचे अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी केलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन माफसूने कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मीना चौधरी (59), कमलेश चौधरी(42) आणि मुकेश चौधरी (40) असे आरोपींची नावे असून तिघेही खसरा क्र.20 मौजा तेलनखेडी येथील रहिवासी आहेत.
माहितीनुसार, माफसूमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले प्रमोदकुमार विश्वासराव तायडे (वय 53 वर्ष,रा. वेलकम सो. प्लॉट नं. 108, वडसकर यांचे घरी किरायाने, दाभा चैक) यांनी आरोपी विरोधात गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रारीत ते म्हणाले की,महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापिठ नागपूरची फुटाळा तलावला लागून असलेली खसरा क्र. 20 मौजा तेलंखेडीची जागा शासनाने 16 एप्रिल 2005 पासून हस्तांतरीत केलेली आहे.ही जागा 30 मे 2022 रोजी 7/12 खसरा नुसार प्रत्यक्षपणे माफसूचे कुलसचिव यांच्या नावे करण्यात आली.मात्र या जागेवर सध्या मिना दिलीप चौधरी, मुकेश दिलीप चौधरी, कमलेश दिलीप चौधरी यांनी अधिकृतपणे कब्जा केला. माफसू विद्यापीठाची तसेच महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी याठिकाणी खाजगी लॉन आणि इमारतीचे बांधकाम केले आहे.
या तक्रारीनुसार गिट्टीखदान पोलिसांनी तिन्ही आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दखल केला आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपासही सुरू केला.
दरम्यान फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करून त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाल्याच्या प्रकरणात महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही रोखठोक भूमिका घेतली होती. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.त्याचप्रमाणे या अतिक्रमणांसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.