नागपूर : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.याकरिता मतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजतापर्यंत राहील. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे.निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी मतदानाच्या आदल्या दिवशीच नागपुरात दाखल झाले आहेत.
प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयापासून आज सकाळी मतदान साहित्य घेवून अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले असून साहित्याचे सेटअप करत आहेत.
नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघ शहराच्या सीमेत आहेत तर सहा ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या १ लाख १ हजार १८२ आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्यावतीने सांगण्यात आली आहे.