नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP) यांनी नुकताच राजकीय वर्तुळात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये लवकरच एक बडा राजकीय नेता प्रवेश करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राला दिली. आम्ही पक्षातील नवीन प्रवेशासाठी मंगळवार हा दिवस निश्चित केला आहे, कारण तो दिवस शुभ आहे. त्या दिवशी मी प्रशासकीय कामासाठी कार्यालयातच असतो, असे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरही बावनकुळे यांनी भाष्य केले. बावनकुळे यांनी पवार हे भाजपच्या संपर्कात नसल्याचा दावा केला आहे. मात्र ते जर भाजपमध्ये आले तयार त्यांचे स्वागतच होईल, असे ते म्हणाले. जर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारताच्या स्वप्नात सहभागी होण्यास तयार असतील तर आम्ही अजित पवारांचे भाजपमध्ये स्वागत करू, असेही ते म्हणाले.
अलीकडच्या काही घटनांचा हवाला देऊन भाजप नेत्यांनी वादाची ठिणगी टाकली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या चर्चा केवळ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे सुरु झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल लिहिले आणि त्यामुळेच अजित यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात भाजपची कोणतीही भूमिका नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.