नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पोट निघालेल्या आणि वजन वाढलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी करा, असे विधान त्यांनी केले. ते नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत स्मार्ट लकडगंज पोलीस ठाणे, गाळे आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जनतेला अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. म्हणून पोलीस गाळे परिसरात जिमसह इतरही सोयी हव्यात. सुदृढ आरोग्य ठेवण्याकडे पोलिसांनी स्वतःवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
त्यासाठी पोट निघालेल्या, वजन वडलेल्यांचे भत्ते कमी करायला हवे. त्याने हे कर्मचारी आरोग्याबाबत जास्त गंभीर होतील, असे गडकरी म्हणाले. पोलीस आयुक्तांनी पोलिसांना सुदृढ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवायला हवे, असेही गडकरी म्हणाले.