नागपूर : १९५१ साली नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली. या संपूर्ण काळात ५३ महापौर शहराने पाहिले. या सर्व महापौरांनी शहराचे नेतृत्व करताना आपापल्या परीने आपल्या शहराच्या विकासासाठी संकल्पना मांडल्या, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व महापौरांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्या कार्यासाठी त्यांना सहृदय सन्मानित करावे, ही भावना प्रत्यक्षात साकारत शहराचे ५४ वे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर महानगरपालिकेचे महापौरपद भूषविलेल्या व हयात असलेल्या महापौरांची भेट घेतली व त्यांना सन्मानित केले.
सकाळी ९.३० वाजता महापौर दयाशंकर तिवारी यांनी माजी महापौर सरदार अटलबहादुरसिंग यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे, सरदार अटलबहादुरसिंग यांचा जन्मदिवस असल्याने महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी ४.३० वाजतापर्यंत महापौरांनी शहरातील उपस्थित सर्व महापौरांची भेट घेतली त्यांचा सन्मान केला. माजी महापौर राजेश तांबे, शहराच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, माजी महापौर मायाताई इवनाते, वसुंधरा मसुरकर, नंदाताई जिचकार, डॉ. कल्पना पांडे, पुष्पाताई घोडे, माजी महापौर व विद्यमान आमदार सर्वश्री विकास ठाकरे, अनिल सोले, माजी महापौर नरेश गावंडे, पांडूरंग हिवरकर, किशोर डोरले या सर्व मान्यवरांची भेट घेउन महापौरांनी मनपाचा मानाचा दुपट्टा, तुळशीरोप आणि सन्मानचिन्ह देउन सर्वांचा सत्कार केला. यावेळी महापौरांसमवेत उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, श्रीमती दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे यांच्यासह संबंधित झोन सभापतींच्या उपस्थितीत सत्कार केला. याप्रसंगी लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे आणि मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी प्रामुख्याने उपस्थित होते.
आज नागपूर शहराचा जो विकास आहे त्यामध्ये शहराचे महापौर पद भूषविलेल्या सर्व मान्यवरांचे मोठे योगदान आहे. शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने आपली भूमिका मांडली, संकल्पना मांडल्या व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केले. त्याचेच परिणाम आज शहरात वाचनालय, उद्यान, रस्ते, पथदिवे व इतर अन्य सुविधा दिसत आहेत. सर्वांच्या संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागे उद्देश हा आपल्या नागपूर शहराचा विकास व्हावा, हाच होता. आपल्या शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणा-या मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने सर्वांची भेट घेण्यात आल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
या सर्व मान्यवरांना मनपामध्ये बोलावूनही त्यांना सन्मानित करता आले असते, मात्र प्रत्येकच महापौराचे कार्य मोठे आहे. हे कार्य त्यांच्या परिवारातील नव्या पिढीला अवगत होणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्यापासून त्यांनाही सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने प्रत्येक माजी महापौराच्या घरी भेट दिल्याचेही महापौरांनी सांगितले.
नागपूरच्या विकासाची उंची वाढविण्यासाठी सूचना द्या
आज नागपूर शहर देशामध्ये विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘व्हिजनरी’ नेतृत्वात शहराने विकासाची मोठी उंची गाठली आहे. आज नागपूर शहरात ‘थ्री लेअर’ उड्डाणपूल आहे ज्यात सर्वात खाली व मध्यभागी रस्ते परिवहन वाहतूक व सर्वात वर मेट्रो रेल धावत आहे. या पुढेही ‘फोर लेअर’ उड्डाणपूल शहरात साकारात आहे. सर्वात खाली रस्ते परिवहन वाहतूक, त्यावर रेल्वे, त्याच्यावर रस्ते परिवहन वाहतूक आणि सर्वात वर मेट्रो. ‘थ्री लेअर’ व ‘फोर लेअर’ अशी ‘मल्टिलेअर’ वाहतूक व्यवस्था असलले नागपूर हे देशातील पहिले शहर असेल. शहराच्या विकासाची उंची पुढेही अशीच वाढविण्यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत. मात्र या कार्यात ज्यांनी विकासासाठी योगदान दिले अशा सर्व माजी महापौरांच्या सूचना, मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन देण्याची विनंती करण्यात आल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.