
चित्रात राघव श्रीकांत छप्परघरे गोळीबार स्क्वेअर नागपूरचा रहिवासी
नागपूर: आषाढी एकादशीनिमित्त आज विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीत दाखल झाली आहे. १७ जुलै २०२४ ला वारकरी सांप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. मंगळवारी रात्रीच सुरु झालेली आषाढी एकादशी उदयातिथीनुसार आज साजरी करण्यात येत आहे.
लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्यने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील पंढरपुरात पोहोचल्या आहेत. आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी (१६ जुलै) पंढरी नगरीत जवळपास १२ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. आज ही संख्या दुप्पट झाली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेवरही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. पंढरपूर हे प्रत्येक वारकऱ्याचे माहेर घर असते. मग विठ्ठल त्यांचा पिता आणि रुक्मिणी त्यांची माता असते. त्यात माहेराची ओढ स्त्रीला किती असते हे सांगायलाच नको. वारीला जाताना स्त्रियांच्या मुखातून ओव्या ऐकायला मिळतात. या ओव्यांमधून स्त्रिया आपल्या विठ्ठल रखुमाईची आठवण काढत आपले सर्वस्व विसरून जातात.
दरम्यान विठुरायाचे वेड आणि पायी वारी हे जगातले एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे.देशी परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहल वाटणारा हा चमत्कार आहे.काही वारकऱ्यांची ही वारी यंदा चुकली त्यामुळे वारकऱ्यांचे मन थाऱ्यावर नाही, पण युगानुयुगे कर कटावर ठेऊन चंद्रभागे तिरी उभा असलेला विठुराया प्रत्येक सजीवाच्या हृदयात विराजमान आहे. त्याचे तिथेच मनोमन दर्शन घेऊन उद्भवलेल्या संकटाला नामशेष करण्याची प्रार्थना करूया.