नागपूर: अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत एनडीपीएस पथकाने १० एप्रिल, गुरुवारी सकाळी जरीपटका येथील नवी समतानगर परिसरातून २७ वर्षीय युवकाला २० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह अटक केली. या प्रकरणात आणखी एक आरोपी सध्या फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोशन भीमराव डोंगरे (वय २७रा. समतानगर, नारी रोड, नवी जरीपटका)असे आहे. तर फरार आरोपीचे नाव उबेर अन्सारी (वय ३५), रा. हसनबाग, नागपूर असे आहे.
सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान अंमली पदार्थविरोधी गस्तीदरम्यान डोंगरे हा मोटारसायकलवर संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबवून पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत झडती घेतली असता, २० ग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल फोन, मोटारसायकल, रोख रक्कम आणि आधारकार्ड असा एकूण १,६५,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.