नागपूर : शहरातील वाडी पोलीस स्टेशनअंतर्गत हत्येची घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी दांड्यानी मारहाण करत ४० वर्षाच्या व्यक्तीची हत्या केल्याचे समोर आले. मात्र हत्येचे नेमके कारण काय याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. राजेश तिवारी ( वय ४०, वाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
माहितीनुसार, मृतक राजेशची पत्नी सोहनी तिवारी (वय ३१) हिने दिलेल्या तक्रारीनुसार २ जुलै रात्री १२.३० च्या सुमारास त्यांच्या घरी तीन अनोळखी व्यक्ती आले. तिचा पती राजेश त्या तिघांनाही ओळखत होता. पाच मिनिटात परत येतो असे सांगून राजेश त्या तिघासोबत बाहेर गेला. तो लवकर न आल्याने बाहेर येऊन पाहिले असताना अनोळखी ते तीन व्यक्ती राजेशला मारत असल्याचे तिने पाहिले. हे पाहून ती घाबरली.घाबरल्याने तिने कोणालाही सांगीतले नाही. नंतर त्या तीन इसमांनी गंभीर जखमी झालेल्या राजेशला घरी आणून सोडले. यादरम्यान त्या तिघांपैकी करण नावाच्या व्यक्तीने सोहनी हीचा विनयभंग केला.आरोपींनी जाताना तिच्या पतीची शाईन गाडीही ( एम. एच. ३१ सि. जे. ७२२०) नेली. सोहनी हिने तिच्या जखमी पतीला याबाबत विचारले असता, त्याने काहीही सांगीतले नाही. नंतर ते झोपी गेले. सकाळी ०७.०० वा. सोहनी हिने तिच्या पतीला उठविले असता, त्याने प्रतिसाद दिला नाही.
यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासानंतर राजेशला मृत घोषित केले.
रजेशची पत्नी सोहनी हिने दिलेल्या तक्रारीनुसार वाडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तापस सुरू केला आहे.