नागपूर: कोविड नंतरच्या काळात नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ऑरेंज आणि एक्वा मार्गिकेवर प्रवासी संख्येत वाढ होत असताना, दुसरीकडे उदघाटन झाल्यावर केवळ तीन दिवसातच पुणे मेट्रो प्रकल्पाने दोन्ही मार्गिकांवर एकत्रितपणे १ लाख प्रवासी संख्येचा पल्ला गाठला आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च रोजी गरवारे ते वनाज आणि पीसीएमसी ते फुगेवाडी या दोन मेट्रो मार्गिकांवर प्रवासी सेवेचे उदघाटन झाले होते.
६ मार्च रोजी उदघाटन झाले आणि त्या पाठोपाठ काही तासातच दोन्ही मार्गिकांवर प्रवासी फेऱ्यांना देखील सुरवात झाली होती. पहिल्या दिवशी – ६ तारखेला – दुपार्री ३ ते रात्री ९.३० वाजे पर्यंत मेट्रो सेवा सुरु होती, म्हणजे पहिल्या दिवशी केवळ ६.३० तासाकरिता प्रवासी सेवा सुरु असली तरीही, या काळात तब्बल ३७,७५२ पुणेकरांनी मेट्रो प्रवासाचा हा विक्रम नोंदवला.
७ आणि ८ मार्च रोजी क्रमशः २८,५८७ आणि ४२,०७० पुणेकरांनी मेट्रोने गरवारे ते वनाज आणि पीसीएमसी ते फुगेवाडी या दोन मार्गिकांवर प्रवास केला. एकूण तीन दिवसात एक लाखापेक्षा जास्त (१,०८,४०९) पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला. ६ मार्च रोजी माननीय मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या दोन मार्गिकांवर प्रवासी सेवेचे तसेच येथील “ड्रीम कमिंग ट्रू” – या प्रदर्शनाचे उदघाटन केले होते. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दिक्षित यांनी या प्रदर्शनासंबंधी माहिती माननीय पंतप्रधान यांना दिली.
या प्रदर्शनात पुणे मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण प्रारूप (मॉडेल) तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाचे विविध वैशिट्ये यांची माहिती प्रदर्शित केलीय होती. त्यात मुख्यते सोलर ऊर्जा, झाडांचे पुनर्रोपण, अत्याधुनिक ५ DBM प्रणाली, मेट्रो निओ, रूट बॉल तंत्रज्ञान, अद्वितीय असे स्टेशनचे डिझाइन पुणे मेट्रो भूमिगत स्थानकाची वैशिट्ये (पुणे मेट्रोचे सिविल कोर्ट भूमिगत स्थानक ३३ मी जामीनीखाली असून ते भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानकांपैकी एक आहे) स्वारगेट मल्टीमॉडेल वजनाने हलके, अल्युमिनियम धातूने निर्मित भारतात पाहिल्यांदाच वापरण्यात येणारी ट्रेन, वनाज येथील कचरा डेपोचे मेट्रो कार डेपोमध्ये केलेले परिवर्तन, फर्स्ट माईल- लास्ट माईल काँनेक्टिव्हिटी, ६० % पेक्षा जास्त नॉन फेअर बॉक्स रेव्हनूर ई विषय दर्शवले आहेत.
“पुण्यात आजपासून आंतरराष्ट्रीय दर्ज्याची मेट्रो सेवा सुरु होत असल्याबद्दल आनंद होत आहे. पुण्यामध्ये नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल, शहरी वाहतूक साधन उपलब्ध होत आहे. मी सर्व पुणेकरांना मेट्रोची सेवा सुरु झाल्याबद्दल अभिनंदन करत आहे,“ हा संदेश माननीय पंतप्रधान श्री मोदी यांनी जनतेला व्हिजिटर बुक मध्ये लिहित जनतेला दिला. उदघाटन झाल्यावर तीन दिवस पुणेकरांनी मेट्रो सेवेला दिलेला हा प्रतिसाद बघता माननीय पंतप्रधान यांचा हा संदेश अतिशय मोलाचा ठरतो.