नागपूर: राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या करणे अवघड असल्याचे माजी राष्ट्रपती तसेच काँग्रेस नेते प्रणब मुखर्जी म्हणाले, धर्माच्या आधारे राष्ट्रवादाची व्याख्या चुकीची असल्याचे ते म्हणाले. संघाने प्रणवदांसाठी आपल्या परंपरेला छेद देत प्रमुख पाहुण्यांआधी सरसंघचालक मोहन भागवतांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘प्रणव मुखर्जींना निमंत्रण यावरुन झालेली चर्चा योग्य नाही. आपण सर्व एक आहोत. मात्र कोणाच्या हे लक्षात येत नाही.’
माजी राष्ट्रपती आणि 43 वर्षे काँग्रेसचे नेते राहिलेले प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन गुरुवारी उपस्थित होते. दरम्यान, मुखर्जींनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतींना वंदन करुन त्यांनी हेडगेवारांना भारतमातेचा महान सुपूत्र म्हटले आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्यासोबत होते. एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर प्रणव मुखर्जी हे दुसरे राष्ट्रपती आहेत ज्यांनी नागपूरला येऊन हेडगेवारांना श्रद्धांजली वाहिली.
भारत हा स्वतंत्र विचारांचा देश आहे. देशाप्रती समर्पणाची भावना हीच खरी देशभक्ती असल्याचे सांगून मुखर्जी म्हणाले, मी याठिकाणी माझी राष्टभावना, राष्ट्रीयता, आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर ठेवण्यासाठी आलो आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती यावर बोलायला आलो. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. वसुधैव कुटुंबकम ही भारताची संस्कृती राहिली आहे. त्यामुळे देशाचे द्वार सर्वांसाठी खुले राहिले आहे.
भारतीय बौद्ध धर्म येथूनच जगात गेला असून जगाने बौद्ध धर्म आत्मसात केला असल्याचे माजी राष्ट्रपती म्हणाले, भारत हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. जागतिक दर्जाचे विद्यापीठ नालंदा, तक्षशीला येथे होते. भारत ही पुरातन संस्कृती आहे. सिल्क रुट, स्पाइस रुट भारतातून जात होते. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. आपण आपल्यात भेदभाव करत राहिले तर देशाची ओळख धोक्यात येईल.
धर्माच्या आधारे राष्ट्रवादाची व्याख्या चुकीची असल्याचे सांगताना मुखर्जी म्हणाले, एक धर्म, एक भाषा ही भारताची खरी ओळख नाही. 7 धर्म, 1600 भाषा तरीही भारतीय ही भारताची ओळख आहे.