Published On : Mon, Dec 11th, 2023

कांद्याची निर्यातबंदी हटवलीच पाहिजे ; नागपुरात विधानभवन परिसरात कांद्यांची माळ हातात घेऊन विरोधकांचे आंदोलन !

Advertisement

नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. विरोधकांनी कांद्यांची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘कांद्याची निर्यातबंदी हटवलीच पाहिजे’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘हल्लाबोल हल्लाबोल, मोदी सरकारवर हल्लाबोल,अशी नारेबाजी करतविरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा पेटला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पाहता महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात कांदा निर्यातबंदीचा मुद्द्यावरूनआंदोलन केले.

Advertisement

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावण्यापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये होता. निर्यातबंदीनंतर कांद्याचा दर कमी होऊन १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या निर्यातबंदीचा विरोध करावा, अन्यथा राज्य सरकारने कांद्याला चार हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, भास्कर जाधव, बंटी पाटील, विश्वजीत कदम, सचिन अहिर, प्रणिती शिंदे, रवींद्र धंगेकर, वर्षा गायकवाड, आदींचा सहभाग होता.