नागपूर : ऑनलाइन गेमिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या सट्टेबाज सोंटू उर्फ अनंत जैन याच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. नागपूर पोलिसांनी सोंटू जैनचा मोठा भाऊ मोंटूला फरार घोषित करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मोंटू जैन हा ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात सहआरोपी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशेष पथकांना फसवणूक प्रकरणात सहआरोपी असलेल्या मोंटू जैन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्या कुठे आहेत ते शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मोंटू जैन याला पकडण्यासाठी विशेष पथके गोंदिया, राजस्थान आणि मध्य प्रदेशात शोध घेत आहेत. 1 ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी केलेल्या झडतीदरम्यान गोंदियातील बँक लॉकरमधून कोट्यवधी रुपये जप्त झाल्यानंतर फसवणूक प्रकरणात मोंटूवर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोंटू जैन अटकेपासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी लपून बसला असून तो सोंटू जैनच्या संपर्कात आहे. सोंटू याने कुटुंबीयांच्या नावावर बेकायदेशीर पैशातून अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आरोपींची मनी ट्रेल्सबाबत चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना त्यांची कोठडी हवी होती. मोंटूचे शेवटचे फोन लोकेशन राजस्थानमध्ये सापडले जेथे त्याचे नातेवाईक राहतात. मोंटूला पकडण्यासाठी विशेष पोलिस पथक राजस्थानला रवाना करण्यात आले आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. पोलिस मोंटू जैन यांच्या विरोधात लुक आउट परिपत्रक जारी करण्याची रणनीती आखत आहेत, असे ते म्हणाले.