नागपूर : प्रक्रियायुक्त सागवान बियाणे ॲमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाईनव्दारे जागतिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा वृक्षलागवड व निसर्ग संवर्धनासाठी उपयोग होणार असून वनविकास विभागाच्या या प्रयत्नामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी येथे वनविकास विभागाव्दारे आयोजित ‘ट्रीटेड टीक सिड्स’ ऑनलाईन विक्रीचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अतिरीक्त मुख्य सचिव प्रविणसिंग परदेशी, वनविभागाचे सचिव विकास खारगे, एफ.डी.सी.एमचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान, एफ.डी.सी.एमचे व्यवस्थापकीय संचालक यु.के अग्रवाल तसेच एफ.डी.सी.एम. व वनविभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
एफ.डीसी.एम लिमी. कंपनीकडून साग बियाण्यांची ॲमेझॉनव्दारे ऑनलाईनच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील बाजारपेठेत ऑनलाईनमुळे या बियाणांची मोठ्या प्रमाणत विक्री होण्यास मदत होईल. ऑनलाईन बियाणे संपूर्ण देशासह जगभरात उपलब्ध होणार असल्याने घराघरापर्यत बियाणे पोहचेल. त्यामुळे वृक्ष लागवडीमध्ये वाढ होऊन देशातील वनशेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
वृक्षलागवडीची सध्या खूपच आवश्यकता असून यासाठी राज्य शासनाने यंदा चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेत यशस्वी केला. त्यामुळे राज्य वनांच्या वृध्दीसाठी जाणीवपूवर्क प्रयत्न करत आहे. त्याकरीता बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून हि बियाणे विक्रीची ऑनलाईन पध्दत फायदेशीर ठरणार आहे. आजच्या वैश्विकीकरणाच्या युगात घराघरापर्यत बियाणे पोहचवून वनक्षेत्र वाढविण्याचा वनविकास विभागाचा हा प्रयत्न ऑनलाईन बियाणे विक्रीच्या माध्यमातून यशस्वी होईल. जागतिक बाजारपेठेमध्ये ऑनलाईन विक्रीसाठी गुणवत्तापूर्ण साग बियाणे संपूर्ण जगात विकले जातील, असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
या बियाणांच्या यशस्वी विक्रीनंतर मधुमक्षीकापालन केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामधून मिळणाऱ्या मधाची, तसेच बांबू रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून बांबूपासून पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण करण्यात येतील. त्या उत्पादनांची भविष्यात ऑनलाईन विक्री करण्यात येईल. या सारख्या नाविण्यपूर्ण योजनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वनविभागाने विविध उपक्रम व योजना राबवून उत्पादन निर्मिती करावी . त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात . त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लावण्यास मदत होईल असे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले.
ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साग बियाणांची विक्री करणे ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. यामुळे देशातील इतर राज्यांना प्रेरणा मिळेल व त्याचा देशाच्या प्रगतीसाठी तसेच निसर्ग संबर्धनासाठी लाभ होईल, असे यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी सागितले.
यावेळी इको रिसॉटर्स पुस्तिकेचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन वनपरिक्षेत्राधिकारी श्रीमती रेखा गावंडे यांनी तर प्रास्ताविक वनविकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यु.के. अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार महाव्यवस्थापक यशविर सिंग यांनी मानले. यावेळी वनविभागाचे तसेच एफ.डी.सी.एम चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.