मुंबई : मणिपूरच्या मुद्द्यावरुन सध्या लोकसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी स्वतःचं वस्त्रहरण करुन घेतले असे म्हटले आहे.
देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला. या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मागील ६० वर्षात काँग्रेसकडून जितकी कामे झाली नाही तीच कामे मोदी सरकारने या ९ वर्षात केली, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही, असेही शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.