मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तर आज अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच विरोधकांनी सभात्याग केल्याचे पाहायला मिळाले.
अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी ‘राज्य सरकारचा घटनाबाह्य, कलंकित सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजीही केली. अधिवेशन सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षा आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतीविषयी आपले म्हणणे मांडले. पण त्यानंतर काही मिनिटातच विरोधकांनी सभात्याग केला.
राज्यातील सरकारला संविधानाची मान्यता नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे, अशी टीका विरोधकांनी केली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधकांचे संख्याबळ घटले असले तरी विरोधकांनी एकजूट होत सत्ताधाऱ्यांविरोधात मोट बांधली आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.