नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विदर्भात पावसाच्या सततधारा सुरु आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने शनिवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
विदर्भातील तीन जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्टसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. यंदा मान्सून विदर्भात नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर उशिरा दाखल झाला. जून महिन्यात पाऊस पडला नाही, तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही अत्यल्प पाऊस झाला. मात्र, महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जोरदार पाऊस सुरू होतो. सततच्या मुसळधार पावसामुळे शेततळे पाण्याखाली गेले आहेत. कापूस, सोयाबीन व इतर पिके पाण्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.