नागपूर : अवघ्या शहरावर ऑरेंज फेस्टिव्हल फिव्हर चढला आहे. संत्र्याच्या नारंगी रंगात जणू शहर रंगून गेले आहे. त्यात पुन्हा महोत्सवाच्या निमित्ताने शहरभर आयोजित विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात भर टाकली आहे. विद्यार्थी, व्यवसायी, नोकरदार, गृहिणी असे सर्व वयोगटातील लोक या उत्साहात सहभागी होत असून, कोणकोणते कार्यक्रम आवर्जून बघायचे, याचे नियोजन केले आहे. महोत्सवात नामांकित शेफचे कुकिंग शो, सुफी गायन, कार्निव्हल परेड, पतंग महोत्सव, नाटक, संगीतमय कार्यक्रम, लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स, स्टॅण्डअप कॉमेडियन शो, कठपुतली शो, कॅण्डी फ्लॉस गर्ल, मिरर मॅन आदींसह अनेक धमाल कार्यक्रम आणि रंजक स्पर्धा होणार आहेत. मुख्य सोहळ्याचे उद्घाटन १८ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
महोत्सवात संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही सहभागी होणार आहेत. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग व निर्यात यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग करण्याचा हा प्रयत्न आहे.
चार दिवसीय महोत्सवांतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा तर दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात फूड शो, नाटक, नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या महोत्सवामुळे नागपूरला जागतिक नकाशावर वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाचे प्रगत तंत्रज्ञान आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्देश शेतीच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे. महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी हा महोत्सव प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत लोकांनी व्यक्त केले आहे. तसेच जागतिक ओळख असलेल्या मास्टर शेफसोबत विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता येणार असून, ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे.
महोत्सवात पहिल्या दिवशी रेशीमबाग मैदानावर ‘आयसीएआर-सीसीआरआय’तर्फे ५० प्रकारचे लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नामांकित शेफ विष्णू मनोहर शेतकऱ्यांसाठी ‘संत्र्याचा हलवा’ आणि संत्र्याच्या सालीपासून ‘मार्मेटेड’ (जॅमसारखा एक प्रकार) तयार करणार आहेत.
नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे आयोजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवात नामांकित घरगुती आणि आंतरराष्ट्रीय कृषी कंपन्यांचे पॅव्हेलियन आणि स्टॉल आहेत. कृषी प्रदर्शनात देशविदेशातील कृषितज्ज्ञांतर्फेसंत्र्याच्या प्रजाती, लागवड, उत्पादन, निर्यातीवर मार्गदर्शन तर संत्र्यावर जागतिक परिसंवाद होणार आहे.
देशविदेशातील कृषितज्ज्ञांचा सहभाग
प्रदर्शनात ब्राझील, अमेरिका, टर्की, कम्बोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि दक्षिण कोरिया या देशातील तज्ज्ञांचा समावेश आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि भारताच्या अन्य राज्यातील तज्ज्ञ प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात धमाल मस्ती
केंद्रात १८ ते २१ जानेवारीदरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत धमाल मस्ती होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये युवक-युवतींसह सर्वांना भाग घेण्याची संधी आहे. त्याअंतर्गत ‘फूड आणि फ्ली बाजार’चे आयोजन होणार आहे.
२० ला कार्निव्हल परेड, पतंग महोत्सव व नाटक
२० जानेवारीला दुपारी ४ ते ७ पर्यंत कार्निव्हल परेड होणार आहे. यात एपिसेंटर हार्ले-डेव्हिडसन बाईकच्या रायडर्सचा समावेश राहील. परेड वेस्ट हायकोर्ट रोड येथून निघणार आहे. २० रोजी रेशीमबाग मैदानावर सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वैदर्भीयांना सहभागी होण्याची संधी आहे. तसेच २० जानेवारीला दुपारी १ ते ३ पर्यंत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘आमच्या हीचं प्रकरण’ या मराठी नाटकाचा शो होणार आहे. शो नि:शुल्क आहे.