मुंबई : पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील पाईट गावात पोपट घनवट यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा संपूर्ण व्यवहार तपासण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले.
बावनकुळे म्हणाले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची आठवड्याभरात चौकशी करून आठ एप्रिल रोजी अहवाल सरकारला सादर करावा असे सांगून अहवाल बघून आवश्यकता वाटल्यास एसआयटीमार्फत चौकशी करू. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी घनवट यांच्याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत, त्यांना संरक्षण देण्याचेही महसूल मंत्र्यांनी पुणे पोलिस व जिल्हा प्रशासनाला सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाईट गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घनवट पिता पुत्रांनी कशा चुकीच्या पद्धतीने बळकावल्या आहेत, याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली.
मंत्रालयातील दालनात सायंकाळी बोलाविलेल्या बैठकीला अंजली दमानिया यांच्यासह तक्रारदार सात शेतकरी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. कोणीही जबरदस्तीने त्यांच्या जमीनी बळकावून घेऊ शकत नाही. जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच सर्व जमिनींबाबत माहिती घेतली जाणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांसाठी जे काही शक्य आहे तेवढे करण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अंजली दमानिया यांनी सर्व शेतकऱ्यांच्यावतीने बाजू मांडताना सांगितले की, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज आणि जगमित्र शुगर्स या संस्थांच्या माध्यमातून घनवट आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे हे संचालक आहेत. त्यांचा आधार घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या आहेत. शंकर रौंदळ नावाचा बनावट शेतकरी उभा करुन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धमकावून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच काही शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या गावातील त्याच नावाचे शेतकरी उभे करुन सह्या घेतल्या आहेत. तर तक्रारदारांनी घनवट यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन स्वतःचा बंगला उभारण्यात आल्याचीही तक्रार केली. घनवट यांनी अधिकाऱ्यांना धमकावून तक्रारदारांवर खोटे खटले दाखल केल्याचेही निदर्शनास आणून दिले.
या सर्व बाबींची चौकशी करुन ८ एप्रिल रोजी याबाबत बैठक घेण्यात येणार असून याप्रकरणी कोणती कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना दिले.
महसूलमंत्र्यांचे दमानियांकडून कौतुक
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल आणि चौकशी करण्याचे आदेश दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूलमंत्र्यांचे कौतुक केले. राज्याला आपल्यासारखे कणखर महसूलमंत्री लाभल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भावनाही त्यांनी बैठकीत व माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.