भंडारा: भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले.
एलपीटीई २३ नंबरच्या इमारतीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान हा स्फोट झाला.
जवाहर नगर परिसरातील जवळपासच्या डझनभर गावांना याचा फटका बसला आहे. या ठिकाणी आर डी एक्स चे निर्माण होते. सध्या कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी गेट जवळ एकच गर्दी केली असून रात्रपाळीत कंपनीत कामाला गेलेले कामगारांचे कुटूंब येथे जमले आहेत.
भंडारा जिल्हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागात येतो, येथे एक आयुध कारखाना (ऑर्डिनेंस फैक्ट्री) आहे. शुक्रवारी कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला. स्फोटानंतर आयुध कारखान्यात आग लागली.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता –
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि अधिकारी पुढील तपास करत आहेत. स्फोटाच्या ठिकाणी बचाव आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच आत अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू आहे. या स्फोटामुळे कारखान्यात मोठी आग लागली आणि त्यात लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.