नागपूर: सर कस्तुरचंद डागा यांचे नागपूरच्या शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम अविस्मरणीय ठरेल, असे आयोजन व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या कस्तुरचंद डागा जन्मशताब्दी समारोह समितीच्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त रवींद्र देवतळे, निगम सचिव हरीश दुबे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार उपस्थित होते.
सर कस्तुरंचद डागा यांनी शहरामध्ये आणि देशातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी व समाजासाठी मोठ्या प्रमाणात आपली मालमत्ता शासनास दान केलेली आहे. त्यातीलच एक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कस्तुरचंद पार्क आहे. कस्तुरचंद डागा यांची १६ डिसेंबर २०१७ रोजी जन्मशताब्दी आहे. त्याप्रीत्यर्थ एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन कस्तुरचंद पार्क येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसंदर्भातील आढावा यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी घेत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.