पुणे: महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष, भारतीय अथलेटीक महासंघाचे सहसचिव , ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत (६९) ह्रदय विकाराच्या झटक्याने गुरूवारी संध्याकाळी निधन झाले.
त्यांच्यामागे बहीण विजया मोरे, भाचा रोहन मोरे, पुतणी गौरी सावंत आणि दिव्या सावंत असा परिवार आहे.
सावंत यांना दुपारी पत्रकार नगर येथे राहत्या घरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर लगेच त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले . संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सावंत यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हे वृत्त समजताच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली होती.
प्रल्हाद सावंत यांनी क्रीडा वर्तुळात खूप मोठे योगदान दिले होते. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसंच २००८-०९ मध्ये पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनामुळे राज्यातील क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.