उस्मानाबाद: राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आज, शनिवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबादमधील शेततळी कामांची पाहणी करण्यासाठी ते शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह भूम तालुक्यात आले होते. वाशी तालुक्यातील पारडी फाट्याजवळ ते आले असता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये, यासाठी पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर काहींना ताब्यात घेतले. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पशुसंर्वधन तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री महादेव जानकर, सजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे जालना जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आहेत. उस्मानाबादमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढील दौऱ्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.