नागपूर : राज्याचे महसूल आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आजनी, गुमथळा आणि वडोदा येथील जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी ४५० च्यावर निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकाच्या विविध समस्या एकूण त्यांचे म्हणणे एकूण घेत त्यांचे समाधान केले.
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गादा रोड अजनी येथील विश्वरंजन सभागृहात, गुमथळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी १२ वाजता कामठी मतदार संघातील गादा रोड अजनी येथील विश्वरंजन सभागृहात, त्यानंतर गुमथळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात आणि त्यानंतर वडोदा ग्रामपंचायत येथे जनसवांद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तीनही ठिकाणी नागरिकांची गर्दी होती. यावेळी वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, शेती, नोकरी, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक आदी क्षेत्रांशी संबंधित निवेदने सोपविण्यात आली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. मंत्री महोदयांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी वडोदा व आजनी येथील नागरिकांना पट्टेवाटप करण्यात आले. यावेळी जमिनींचे तात्काळ पट्टेवाटप करण्याचे अभियान महसूल विभाग राबवणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना दिली. यावेळी, माजी आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान, विनोद पाटील, उमेश रडके, रमेश चिकटे यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.