मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला होता.
मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येतील,असे जाधव म्हणाले.विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंचा गेम हा भाजपच्याच नेत्यांनी केला. मात्र, या निवडणुकीत त्या निवडून येतील. कारण आतापर्यंत ज्या नेत्याने पंकजा मुंडे यांचा गेम केला, त्याच्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्या राजकीय नेत्याची कारकीर्दच बरबाद होईल.
त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना निवडून आणतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. इतकेच नाही तर महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असेही जाधव म्हणाले.