बीड : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या मुलीने धक्कादायक खुलासा केला. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून आरोपींनी देशमुख यांच्यावर कसा अमानुष अत्याचार केला याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हत्येपूर्वी संतोष देशमुख यांनी आपली मुलगी वैभवी देशमुखशी काय बोलले याचा खुलासा केला.
आरोपपत्रानुसार, हत्या होण्याच्या काही काळ आधी संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीशी संवाद साधला होता. वैभवीच्या जबाबानुसार, देशमुख म्हणाले होते, “माझे काही बरं-वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे.” या घटनेपूर्वीच विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात फोनवर संवाद झाला होता. देशमुख यांनी चाटेला समजावताना सांगितले होते,भाऊ, एवढं काय झालं नाही? कशाला इतकं ताणता? लहान गोष्टीवरून जीवावर उठता? हा संवाद जवळपास 10-12 मिनिटे सुरू होता, असेही वैभवीने सांगितले.
दरम्यान 6 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग गावातील ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना मारहाण करून गावातून हाकलून दिले. यानंतर विष्णू चाटेने देशमुखांना फोन केला, आणि त्यानंतर देशमुख तणावात होते, असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. 9 डिसेंबर रोजी देशमुखांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना अमानुषपणे मारहाण करून संपवण्यात आले. आरोपींनी त्यांना अत्यंत हालहाल करून मारल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.