नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यापार्श्वभूमीवर नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी बड्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे यानुसार गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना जमा होण्याचे आदेश देण्यात येतात. मात्र नागपुरात काही राजकीय नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनात चक्क ऑन-ड्युटी असलेले NMC, NIT आणि इतर सरकारी एजन्सीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.’नागपूर टुडे’ने या घटनेवर प्रकाश टाकला.
नागपूरच्या संविधान चौकात आज बड्या नेत्यांच्या राजकीय रॅलीत ऑन-ड्युटी असलेल्या NMC,एनआयटीच्या कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश आदल्याच दिवशी देण्यात आले होते. कार्यालयीन स्थळी हजेरी लावून हे कर्मचारी रॅलीत सहभागी झाले. यादरम्यान गणवेशात असलेल्या कर्मचाऱ्यांना “डीएफ आर्मी” अशा आशयाचे पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालण्यास सांगण्यात आले होते.
या कामगारांमध्ये संगणक परिचालक, परिचर, कंडक्टर, ड्रायव्हर, सिटी बस सेवेतील मेंटेनन्स कर्मचारी आणि इतर प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कामगारांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्या कोणत्या एका पक्षाच्या किंवा नेत्यांच्या अथवा समर्थकांच्या मालकीच्या किंवा प्रभावशाली असू शकतात, ज्यांनी कर्मचाऱ्यांना राजकीय मेळाव्याला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, असा अंदाज आहे.
काही कार्यकर्त्यांना ते या रॅलीत सहभागी होत असल्याची जाणीव देखील नव्हती. यादरम्यान ‘नागपूर टुडे‘ने काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता काहींनी बोलण्यास नकार दिला तर काहींनी आम्हाला वरून आदेश आल्याचे सांगितले.
एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की. कार्यालयात उपस्थिती नोंदवल्यानंतर सकाळी 9:30 वाजता संविधान स्क्वेअरवर जाण्यासाठी आम्हाला काल संदेश मिळाला. आम्हाला वाटले की ते एखाद्या परिषदेसाठी किंवा प्रशिक्षणासाठी याठिकाणी आम्हाला बोलविण्यात आले असावे.मात्र आल्यानंतर कळले की ही राजकीय रॅली आहे.रॅलीसाठी काही शहर बसेसचाही वापर करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
‘नागपूर टुडे’च्या टीमने जेव्हा याबाबत विचारपूस करण्यसाठी एनएमसी आणि एनआयटी कार्यालयांना भेट दिली आणि संगणक ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले, कारण ते आजच्या भाजपच्या रॅलीत सहभागी झाले होते.