नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी (ता. २३) इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार झाला. नागपूर (भारत) आणि कार्लस्रू (जर्मनी) या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्याचे क्षेत्र ओळखण्यासाठी आणि विस्तारासाठी हा भागीदारी करार करण्यात आला आहे. या करारावर नागपूरच्या वतीने महापौर नंदा जिचकार, महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह आणि कार्लस्रूच्या वतीने आयूसीचे भारतातील कार्यक्रम संचालक पियर रॉबर्टो रेमिटा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर उपस्थित होते.
भारत या कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि कार्लस्रू हे संयुक्तपणे विशेषत: शाश्वत शहरी विकास आणि भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात स्थानिक कृती योजना तयार करणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करण्याआधी आय.यू.सी.चे भारताचे प्रतिनिधी आशीष वर्मा (शाश्वत विकास तज्ज्ञ) यांनी प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे थोडक्यात माहिती दिली. सदर कार्यक्रमाचा उद्देश, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि शहरांमध्ये असलेल्या समस्यांची माहिती दिली. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागपूर शहर, संधी आणि आव्हाने याबाबत थोडक्यात माहिती दिली. आययूसी कार्यक्रम नागपूर शहराला ज्ञान विनिमय योजनेच्या दृष्टीने कशी मदत करतो हे सांगताना स्मार्ट सिटी नियोजनाची अंमलबजावणी याबाबत महत्त्वाचे मुद्दे विषद केले. शहरी विकास आणि नगरपालिका सेवांना एकत्रित करण्यास प्राधान्य, कार्बनचा कमी उपयोग आणि शहरी नवीनीकरण, शाश्वत गतीशीलता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. शहरी विकासाच्या प्राथमिकतांना अंमलात आणण्यासाठी त्यांना सर्वोत्तम धोरण ओळखण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आय.यू.सी-भारत संघ आणि कार्लस्रू शहराने कार्य करावे, अशी विनंती केली.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले, नागपूर शहरातील शाश्वत शहरी विकासाशी संबंधित मुद्द्यांबद्दल नागपूर शहर जाणून घेण्यासाठी व युरोपीय शहरांमध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भागीदारीमुळे नागपूर आणि कार्लस्रू हे शाश्वत शहरी विकासाशी संबंधित विषयांवर एकत्रितपणे काम करतील. यामध्ये शहरी गतिशीलता, कमी कार्बन उत्सर्जन आणि शहरी नवीन उपक्रम तसेच शहरी विकास आणि नगरपालिका सेवांचे एकीकरण यांचा समावेश असेल. कार्लस्रू शहर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यांच्या गतिशीलता योजनेचे मॉडेल खूप उत्साहवर्धक आहे. नागपूर आणि कार्लस्रू यांच्यातील ज्ञानविनिमय सक्षम होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महापौर नंदा जिचकार यांनीदेखिल या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. जागतिक हवामानातील बदल आणि शाश्वत शहरी विकासाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षी पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, हवामान बदलाचा प्रतिकुल परिणाम नागरिकांच्या जीवनावर होऊ लागला आहे. बदललेले वातावरण आणि नैसर्गिक पर्यावरणाचा निकृष्ट दर्जा यासाह आता हवामान बदलाच्या प्रतिकुल परिणामांवर मात करण्यासाठी ठळक आणि अभिनव कृती करणे कार्लस्रूच्या सहकार्याने आय.यू.सी. कार्यक्रमाद्वारे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात नागपुरातील भावी पिढीने चांगले जीवन जगावे अशी आपली इच्छा असून या कार्यक्रमासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले.
काय आहे आय.यू.सी. कार्यक्रम?
आय.यू.सी. कार्यक्रम भारत, पूर्व आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकामधील युरोपीयन युनियनमधील शहरे आणि भागीदार शहरांमधील शाश्वत शहरी विकासावर सहकार्य वाढवितो. कार्यक्रमाद्वारे शाश्वत शहरी विकासाच्या समस्यांना हाताळण्यासाठी नवा दृष्टीकोन जोडण्यात येईल. दोन्ही शहरांचे प्रतिनिधी विनिमय भेटीस उपस्थित राहतील आणि शहरांच्या शाश्वत नागरी विकासास चालना देण्यासाठी स्थानिक कृती योजना विकसित करतील.