नागपूर: टेकऑफच्या आधी नागपूर ते बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटचा आपत्कालीन एक्झिट दार उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी आज २ ऑक्टोबर रोजी दिली.
स्वप्नील होले असे या व्यक्तीचे नाव असून तो 30 सप्टेंबरच्या रात्री १० वाजता नागपूरहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 6803 मध्ये चढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी विमानाच्या इमर्जन्सी एक्झिट दरवाजाजवळ बसला होता.टेकऑफ करण्यापूर्वी, क्रू मेंबर्स प्रवाशांना माहिती देत असताना, त्या व्यक्तीने दरवाजा उघडण्याचा कथित प्रयत्न केला. रात्री 11.55 वाजता विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर, होले यांना एअरलाइनच्या कर्मचार्यांनी पोलिस ठाण्यात नेले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपी हा १ ऑक्टोबरला बँकॉकला जाणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. एअरलाइन कर्मचार्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (जीवन धोक्यात आणणारा किंवा वैयक्तिक सुरक्षितता) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आणि घटनेच्या संदर्भात आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.