नागपूर : चोरीच्या आरोपावरून झालेल्या वादातून 2 जानेवारी रोजी दक्षिण एक्स्प्रेसच्या (12721) जनरल डब्यात एका प्रवाशाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून मारहाण केलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला.
शशांक रामसिंग राज (25) असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील राजापूर येथील रहिवासी आहे. तो मित्रासोबत सिकंदराबादहून झाशीला जात होता. पहाटे 3:30 च्या सुमारास, शशांक प्रसाधनगृहाजवळ बसला होता आणि तो झोपी गेला होता तेव्हा चार सहप्रवाशांनी त्याच्या खिशातून 1,700 चोरले आणि त्याच्या मित्राचा मोबाइल फोन घेण्याचा प्रयत्न केला.
शशांकला जागा आली आणि त्याने पैसे परत मागितल्यानंतर संशयितांशी त्याच्याशी वाद घातला. तेव्हा त्यांनी त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यामुळे शशांकला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याची प्रकृती झपाट्याने खालावली असे साक्षीदारांनी सांगितले.
रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रेल्वे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले.
सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मोहम्मद फैयाज (19), सय्यद समीर, वय (18), एम. शाम कोटेश्वर राव (21), मोहम्मद अमन (19) या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.