Published On : Fri, Feb 9th, 2024

ओबीसींचा कळवळा दाखविणारे पटोले-वडेट्टीवार आता राजीनामा द्या!

• चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल • राहुल गांधीच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे राज्यभर तीव्र आंदोलन
Advertisement

राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहेत. आणि, त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्पगार आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोन्ही विरोधीपक्षातील नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ज्या आकसाने बोलतात त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चिड दिसून येते. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण ओबीसी समाज कॉंग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपाने राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहे. राज्यभर सर्वत्र सर्व जिल्हा मुख्यालयी व महत्वाच्या शहरात भाजपा तसेच ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. उद्या शनिवारी दि. १० रोजी राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी भाजपाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नागपूर येथील आंदोलनात आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनुराधा अमीन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, गिरीश व्यास, मल्लिकार्जून रेड्डी, बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम, अशोक धोटे, अर्चना डेहनकर, बाल्या बोरकर, प्रगती पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहीत पारवे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, रोहित मुसळे, महेश दिवसे, दिलेश ठाकरे, डॉ. प्रिति मानमोडे, नरेश मोटघरे, जयप्रकाश गुप्ता, श्रद्धा पाठक, नरेंद्र धनोले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

• तर ओबीसींचा कळवळा नौटंकी ठरेल
पटोले आणि वडेट्टीवार यांनी पदाचा राजीनामा दिला तरच त्यांच्या मनात ओबीसींचे स्थान काय हे सिद्ध होईल. अन्यथा, ते दाखवित असणारा कळवळा त्यांची नौटंकी ठरेल असेही श्री बावनकुळे म्हणाले.